हतीफ
अहमद आणि त्याचे दोन-तीन मित्र आपल्या मेंढ्यांना घेऊन जवळच्या कुरणाकडे निघाले होते. गावापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटासा पाण्याचा झरा होता. त्या पाण्यामुळे तिथे एक छोटंसं हिरवं कुरण तयार झालेलं होतं. गावातले लोक आपल्या शेळ्या-मेंढ्यांना , उंटांना आणि घोड्यांना तिथे चरायला घेऊन जायचे. त्या डोंगररांगांमध्ये असलेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ त्या गावासाठी वरदान ठरले होते, कारण तिथला पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा वाळवंटातल्या त्या गावासाठी अमृतासमान होता. त्या डोंगरांबद्दल जुन्या म्हाताऱ्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकलेली कहाणी खरी मानली, तर ते डोंगर प्रत्यक्ष देवदूताने तिथे निर्माण केले होते. अजूनही डोंगरातल्या गुहांमध्ये देवदूत येतात आणि काही दिवस विसावा घेतात अशी आख्यायिका गावात प्रसिद्ध होती. अहमदच्या आपल्या मेंढ्यांच्या कळपावर अतिशय जीव होता. त्यांच्या अंगावरची लोकर कातरतानाही तो इतक्या नाजूकपणे हात चालवायचा, की कधीही त्या प्राण्यांच्या अंगावर जखम व्हायची नाही. त्याने आपल्या पाळीव मेंढ्या अथवा शेळ्या कधीही खाटकाकडे विकल्या नाहीत. त्या मेंढ्यांच्या ...