बर्झख

हमीद रात्र सुरु झाल्या झाल्या गावातून बाहेर पडून घाईघाईने कब्रिस्तानाच्या दरवाज्यापाशी आला होता.आज त्याच्या ६६५ रात्री चाललेल्या तपस्येची फलनिष्पत्ती होणार होती.प्रत्येक गोष्ट अगदी नियमाप्रमाणे होणं गरजेचं होतं. कब्रस्तानाच्या दरवाज्याची चौकट त्याच्यासाठी अतिशय महत्वाची होती. चौकटीची रेष त्याने आधी हातातल्या काठीने नीट आखून घेतली. वाळूत ओढलेली ती रेष त्याच्यासाठी अक्षरशः जगण्या-मरण्याच्या सीमारेषेइतकी महत्वाची होती. त्या रेषेला मध्य मानून त्याने आपला बकऱ्याच्या कातडीचं आसन कब्रिस्तानाच्या आत अर्धं आणि बाहेर अर्धं अशा पद्धतीने अंथरलं. आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला नऊ नऊ लिंबं आणि आदल्याच दिवशी कब्रिस्तानातून आणलेल्या मातीच्या नऊ-नऊ बाहुल्या मांडून ठेवल्या.बाहेरच्या बाजूला एक मोठ्या माणसाची आणि आतल्या बाजूला एक लहान मुलाची कवटी त्याने एका काळ्या कपड्यावर ठेवली आणि तळहातावर जखम करून आपल्या रक्ताचे थेंब त्या कवट्यांवर सोडले. या सगळ्या सोपस्कारानंतर त्याची तपश्चर्या सुरु झाली.

त्या अमावास्येच्या रात्री आकाशात अल असदच्या ( अल असद - सिंह राशीचा तारकासमूह ) ताऱ्यांची तेजस्विता उठून दिसत होती. ती वेळ, तो असादच्या ताऱ्यांचा तेजस्वी प्रकाश आणि मागच्या ६६५ दिवसांची तपस्या या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येणं अतिशय महत्वाचं होतं. हमीदच्या घरात त्याच्या पूर्वजांनी एका संदूकात ठेवलेल्या हस्तलिखितांतून त्याला या गूढविद्येची तोंडओळख झाली होती. त्याचे पूर्वज करणी, भूतबाधा किंवा चेटूक उतरवण्याच्या कलेत माहिर होते. गावात अशी वदंता होती, की त्यांना अनेक चांगले जीन वश होते. परंतु एका घटनेत अतिशय विचित्र अपघातात एकाच वेळी हमीदचे आजोबा, वडील आणि चाचा नाहीसे झाले होते. त्यांची होडी समुद्रात मासेमारीसाठी गेली ती परत आलीच नाही. त्या दिवसापासून हमीद त्या घरात एकुलता एक पुरुष व्यक्ती उरलेला होता. मशिदीतल्या मौलवींनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्यामागे कोणत्या तरी दुष्ट शक्तीचा त्या कुटुंबाला निर्वंश करण्याचा डाव होता, पण ऐन वेळी हमीद समुद्रात न गेल्यामुळे तो डाव फसला होता.

शोधाशोध करून मनुष्यशक्तीच्या आवाक्यातले मार्ग खुंटल्यावर हमीदने हस्तलिखितात काही मार्ग सापडतोय का, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. अनेक दिवस काहीही मार्ग सापडत नव्हताच...पण अखेर एके दिवशी त्या संदूकाच्या आत एक चोरकप्पा त्याला दिसला. त्यात ठेवलेली एक भेंडोळी आणि त्याखाली ठेवलेली चिट्ठी त्याला दिसली. त्यात त्याच्या वडिलांच्या हाताने लिहिलेला मजकूर होता. त्या दिवशीपासून त्याने झपाटल्यागत कब्रिस्तानाची तपस्या करायला सुरु केली होती.

हमीदची तपस्या आता रंगात आली होती. डोळे मिटून डोकं गदागदा हलवत त्याने कसलेसे मंत्र म्हणायला सुरु केले. मंत्राच्या प्रत्येक आवर्तनानंतर त्याच्या हाताच्या जखमेतून रक्ताचे काही थेंब तो त्या दोन्ही कवट्यांवर टपकवत होता. चार-पाच तास गेले. मध्यरात्रीचा प्रहर सुरु झाला. हमीदच्या संयमाची आता खरी परीक्षा होत होती. तोही आता इरेला पेटलेला होता. अखेर त्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आला. समोरच्या दोन्ही कवट्या हवेत उडाल्या आणि नाहीशा झाल्या. त्या कवट्यांच्या जागी दोन छोटी आणि दोन मोठी पावलं प्रकट झाली.

" तुला काय हवंय? " एक घोगरा खोल आवाज उमटला. हा आवाज त्या कब्रिस्तानाच्या मालकाचा - इब्लिसचा होता. हमीदने घरी वाचलेल्या हस्तलिखिताप्रमाणे एक एक घटना घडत होती.

" मुझे बर्झख में शामिल कर दो....मला धरती आणि बर्झख या दोन्ही लोकांमध्ये वास्तव्य करायचं आहे. बर्झख
लोकातल्या आत्म्यांनी माझ्या मागण्या मान्य कराव्या अशी माझी इच्छा आहे...." हमीदने मागणी केली. बर्झख म्हणजे दोजख ( नरकलोक ) आणि अफ्लाख ( स्वर्गलोक ) याच्या मधली जागा. जन्म घेण्यासाठी आसुसलेले अनेक आत्मे इथे येतात आणि देवदूत त्यांना त्यांच्यासाठी 'मकसूस' केलेल्या गर्भात नेऊन सोडतात. तसंच, इच्छा अतृप्त राहिलेले आत्मे इथून पुढे जाऊ शकत नाहीत आणि पुनर्जन्माची अपेक्षा करत इथेच घुटमळतात. स्वर्गाच्या अनेक पायऱ्यांमधली ही सगळ्यात खालची पायरी समजली जाते. अर्थात जिवंत मनुष्याला बर्झखमध्ये जागा मिळणं शक्य नाही हे इब्लिसला माहित होतं.

" माझी आणि माझ्या शक्तीची जागा म्हणजे दोझख. प्रेषित आणि फरिश्ते तुला बर्झखसाठी मदत करू शकतात. तू माझ्या आवाक्याबाहेरची मागणी करतो आहेस. " इब्लिसने स्पष्ट केलं.

" माझ्याकडे प्रेषित आणि फरिश्ते यांच्यापर्यंत पोचायची विद्या नाही. माझे अब्बा आणि बडे अब्बा मला जी हस्तलिखितं देऊन गेले, त्यात गूढविद्या लिहिलेली आहे आणि त्यातून काहीही मिळू शकत असंही लिहिलेलं आहे. मला बर्झख लोकाशी आजन्म संपर्कात राहायचं आहे, मला दुसरं काहीही नको. " हमीदने तिढा आणखी गुंतागुंतीचा केला.

इब्लिसला हमीदच्या मनात नक्की काय शिजतंय, याचा पत्ता लागत नव्हता. आजवर त्याच्याकडे अशी विचित्र मागणी कोणी केली नव्हती. त्याला प्रसन्न करणाऱ्या लोकांनी त्याच्याकडे कर्णपिशाच्च, वाचासिद्धी किंवा मदतनीस म्हणून मृत्युलोकाचे जीन अशा पद्धतीच्या मागण्या केल्या होत्या, काहींनी थेट मृत्युलोकात स्वतःसाठी जागा मागून घेतली होती पण जन्मलोकाशी संबंधित मागणी आज पहिल्यांदाच होतं होती. त्यात तपस्येमुळे हमीदने इब्लिसला आपल्या वाचनात बांधून घेतलं होतं, त्यामुळे त्याची मागणी पूर्ण करण्याचं टाळता येणंही शक्य नव्हतं.

अखेर इब्लिसने कब्रिस्तानाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या पावलांच्या दिशेला एक लिंबू ढकललं.अर्थात आता या प्रश्नाचं उत्तर त्याच्याऐवजी जन्नत लोकांच्या जीनने द्यावं अशी त्याची अपेक्षा असल्याचा स्पष्ट झालं. हमीदने पुन्हा एकदा तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला.

" इब्लिसने फरिश्ते माझी मदत करतील असं सुचवलं आहे. मला उत्तर हवंय. मला बर्झख लोकाशी आजन्म संपर्क हवा आहे आणि बर्झख लोकातल्या आत्म्यांना मी काहीही विनंती केली तरी त्यांनी ती मान्य करावी अशी माझी अपेक्षा आहे. "

अतिशय मंजूळ, शांत आणि गंभीर आवाजात फरिश्ता बोलता झाला..." बेटा हमीद, हम काली तपस्या का फल नहीं दे सकते. तुमने इब्लिस की तपस्या की है....जवाब वोही देगा. "

अखेर वैतागून इब्लिसने एक प्रस्ताव मांडला. त्याने स्वतः मृत्युलोकातून जन्मलोकात प्रवेश करायची परवानगी मागितली. फरिश्ता राजी झाला. इब्लिसच्या शक्तीच्या बदल्यात फरिश्ता हमीदला बर्झख लोकांमध्ये संचार करायची आणि मागण्या पूर्ण करण्याची शक्ती द्यायला राजी झाला. इब्लिसचा शक्तिपात म्हणजे पृथ्वीवर चांगल्या घटनांची नांदी असल्यामुळे फरिश्ता मनोमन सुखावला. अर्थात त्याने कर्तव्यात कसूर नं करता इब्लिसला सावध केलं -
" इब्लिस, तुला माहित आहे ना, की तुझ्या लोकातून आमच्या लोकात आल्यावर काय होईल? जोपर्यंत तुझं आत्म्याचं रूप पृथ्वीवर एखाद्या शरीरात प्रवेश करून जन्म घेत नाही, तोपर्यंत तू बर्झखमध्ये भटकत राहशील. तुझ्याकडे तुझी कोणतीही शक्ती राहणार नाही. जन्म घेतल्यावर तुला एक तर आत्महत्या तरी करावी लागेल, किंवा वाईट कर्म करून तुझ्या पापाचा घडा भरून घ्यावा लागेल...तरच तुला पुन्हा जहन्नुममध्ये जात येईल आणि तू पुन्हा इब्लिसच्या रूपाने तुझ्या मृत्युलोकात वास करू शकशील..."

इब्लिसकडे दुसरा मार्ग नव्हता. चरफडत, त्रागा करत पण नाईलाजाने त्याने सगळ्या गोष्टी मान्य करून बर्झखमध्ये प्रवेश करण्याचं मान्य केलं. फरिश्ता हमीदला पृथ्वीलोक आणि बर्झख या दोघांमध्ये संचार करायची आणि बर्झख लोकात हवी ती मागणी करण्याची मुभा देऊन शांत झाला.आता कब्रिस्तानाच्या दारापाशी काहीही उरलं नाही.

पुढच्याच दिवसापासून हमीदने बर्झख लोकातून चांगल्या आत्म्यांना गावातल्या चांगल्या घरांमध्ये जन्म घ्यायला उद्युक्त करायला सुरु केलं. त्याच्या शब्दाला अव्हेरून काही करणं त्याला मिळालेल्या वरदानामुळे बर्झख लोकातल्या कोणालाच शक्य नव्हतं. बर्झख लोकातले सगळे फरिश्ते त्याला साथ देत होते. गावाचा भलं होताना दिसत असल्यामुळे हमीदच्या मागण्यांना फरिश्ते पूर्ण करत गेले.

एके दिवशी हमीदने मनाचा हिय्या करून अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा व्यक्त करायचा विचार केला. बर्झख लोकात आल्यावर फरिश्ता त्याच्यासमोर उभा राहिला आणि हमीदने प्रश्नाचा खडा टाकला...

" माझे अब्बा, चाचा आणि बडे अब्बा इथेच आहेत का? " त्याने विचारलं.

" होय...त्यांचा मृत्यू अकाली झाला. इब्लिसने त्यांना कपटाने समुद्रात बुडवलं. त्यांच्याकडे असलेल्या जीनांच्या साहाय्याने ते नेक काम करत होते, पण इब्लिसला ते सहन होतं नव्हतं. त्यांना मारणं इब्लिसच्या आवाक्याबाहेर होतं, कारण त्यांची रूह नेक होती. शेवटी इब्लिसने समुद्रात वादळ निर्माण करून डाव साधला. असे आत्मे जन्नतमध्ये जात नाहीत, कारण त्यांचा मृत्यू अकाली झाला असतो."

" मला त्यांना भेटायचं आहे.."

हमीदसमोर तिघांचे आत्मे प्रकट झाले. एकमेकांकडे बघत त्यांनी मनसोक्त रडून घेतलं. हमीदला त्याच्या अब्बानी स्पर्श करायचा प्रयत्न केला, पण आत्म्याला देह नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. अखेर हमीदने त्यांना थांबवलं.

" अब्बा, चाचा, बडे अब्बा, तुम्ही आपल्या घरात पुन्हा येणार. मेरी शादी हो गयी है. फरिश्ता हमारे साथ है, हम पे मेहेरबान है...इन्शाल्ला हमारा घर पहले जैसा होगा..." हमीदने त्यांना आनंदवार्ता कळवली.

तिघांनी आनंदाने हमीदकडे बघितलं आणि समाधानाने ते अंतर्धान पावले.

पुढच्या चार-पाच वर्षात हमीदच्या गावात सगळीकडे आनंदीआनंद पसरला. सगळ्या घरात चांगली मुलंबाळं जन्माला आली. हमीदच्या स्वतःच्या घरी तीन मुलं जन्माला आली. ती कोण आहेत हे हमीदला माहित होतं. एके दिवशी त्याने बर्झखमध्ये प्रवेश करून एका चांगल्या आत्म्याचा गावातल्या एका घरात पप्रवेश निश्चित करून घेतला. तिथून निघणार तोच त्याच्या समोर इब्लिस येऊन उभा ठाकला...

" हमीद, आज सात वर्ष झाली...मी अजून बर्झखमध्येच भटकतो आहे. माझ्यासाठी काहीतरी कर...मला जन्म घेणं आवश्यक आहे, अन्यथा मी कधीच माझ्या लोकात परतू शकणार नाही..."

हमीद हसला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. इब्लिसकडे बघून त्याने स्मितहास्य केला आणि तो उत्तरला...
" इब्लिस, तुझी तपश्चर्या करायची गरज मला का पडली माहित आहे? मला त्या संदुकात चोरकप्प्यात मिळालेल्या भेंडोळ्यावर तुझ्या तपश्चर्येची माहिती होती. वडिलांनी चिट्ठीत लिहिला होतं, आम्ही कोणी जर नाहीसे झालो, तर या तपश्चर्येतून तुला आमच्यापर्यंत पोचता येईल. आम्ही बर्झखमध्ये असू, इतकंच लक्षात ठेव. "

" म्हणजे...म्हणजे तुला आधीपासून बर्झख लोक माहित होता?"

" होय."

" मग आता माझा काम कर आणि मला मुक्त कर.."

" इब्लिस, माझ्या घरच्यांना कपटाने मारताना तुला काही वाटलं नाही ना? आता तू अशा ठिकाणी आहेस, जिथे तुझा शक्तिपात झालेला आहे आणि तू अडकून पडलेला आहेस. मला जे हवं, ते साध्य झालेलं आहे..."

" म्हणजे? मला तू इथेच अडकवून ठेवणार?"

" होय.."

इब्लिसने थयथयाट केला. हमीदला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. शेवटी हतबल होऊन त्याने हमीदला गयावया करायला सुरुवात केली. हमीद शांत होता. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये इब्लिसला त्याने अशा पद्धतीने अडकवून ठेवलं होतं, की त्याच्याकडून कोणतीही कटकारस्थानं आता शक्य नव्हती.

Comments

Popular posts from this blog

मुहारीब

भ्रम

सफर