अक्स

सुलतान इब्राहिम आपल्या खाजगी दालनात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. त्याच्या समोर एका भल्यामोठ्या लाकडी मेजावर बकऱ्याच्या कातड्यावर रेखाटलेला खेदिरा प्रांताचा नकाशा होता. त्या नकाशावर त्या प्रांताच्या अमीराच्या हवेलीची जागा इब्राहिमच्या डोळ्यात खुपत होती. अरबस्तानाच्या तेवीस प्रांतांच्या अमीरांनी आपल्या सगळ्यात मोठ्या मुलीचा निकाह इब्राहीमशी लावून दिल्यामुळे अर्धा अरबस्तान त्याच्या पोलादी मुठीत आलेला होता. सोयरीक जोडून त्याने सगळ्या अमीरांना आपलं अंकित करून घेतलं होतं. त्या नकाशावर एकएक करून जोडल्या गेलेल्या प्रांतांवर सुलतानाने आपल्या साम्राज्याचं चिन्ह उमटवून नकाशा व्यापून टाकला होता....पण एक छोट्या आकाराचा खेदिरा प्रांत तेव्हढा त्याच्या हातात अजून येत नव्हता. 

इतर प्रांतांप्रमाणे या प्रांतावर कोणत्याही पुरुषाचा अंमल नव्हता. त्या प्रांताची राज्यकर्ती यास्मिन नावाची एक स्त्री होती. तिच्या तैलचित्रांवरून आणि ज्या ज्या भाग्यवान लोकांनी तिचा दीदार केलेला होता, त्यांच्या स्तुतीवरून इतका स्पष्ट होतं होतं की अरबस्तानात तिची ख्याती एक लावण्यवती, पराक्रमी आणि खंबीर स्त्री-प्रशासक अशी होती. तिच्या सौंदर्याबद्दल अरबस्तानात अशी आख्यायिका होती, की तिच्याइतकी लावण्यवती आणि चिरतरूण स्त्री आजवर अरबस्तानात जन्माला आलेली नव्हती. तिच्या वयाबद्दलही लोकांमध्ये अतिशय कुतूहल होतं, कारण अनेक वर्षांपासून ती आहे तशीच दिसते अशी वदंता सगळीकडे पसरलेली होती. तिच्या प्रांतात स्त्रिया पुरुषांहून जास्त महत्वाच्या मानल्या जात होत्या.तिच्या दरबारात अनेक स्त्रियांनी महत्वाच्या पदांवर काम करून आपल्या पराक्रमाची आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिलेली होती. अशा या विलक्षण प्रांताबद्दल अरबस्तानच्या लोकांमध्ये इतका आदर होता, की मनात असूनही केवळ लोकांमध्ये आपल्याबद्दल नाराजी पसरेल या भीतीने इब्राहिमला या प्रांतावर आक्रमण करणं अशक्य होतं. 

आपल्या तेवीस बेगम आणि त्यांची पट्टराणी असणारी इब्राहिमचा पहिली बेगम हुस्ना यांच्या गोतावळ्यात राहत असूनही इब्राहिमला अरबस्तानातली सर्वाधिक सुंदर स्त्री आपल्या मुठीत नसल्याची खंत होती. त्याने अनेक वेळा विविध मार्गांनी यास्मिनला मागणी घातली होती. सत्तेचा, धनदौलतीचा आणि बळाचा माज इब्राहिमच्या प्रत्येक खलित्यात डोकावत असल्यामुळे यास्मीनने त्याच्या प्रयत्नांना कधीही दाद लागू दिली नव्हती. दोन वर्ष प्रयत्न करून अखेर इब्राहीमने मागणी घालण्याचा नाद आवरता घेतला असला तरी त्याच्यासारख्या महत्वाकांक्षी आणि सत्तांध मनुष्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. 

त्याच्या खास मर्जीतल्या चार-पाच सरदारांना त्याने आज आपल्या अंतःपुरात पाचारण केलं होतं. सरळ मार्गाने काही होत नसल्यामुळे त्याने आडमार्गाचा अवलंब करण्याची योजना आखलेली होती. आज त्या सरदारांमध्ये महत्वाचा होता मिस्रच्या दूरदेशाहून आलेला आणि अनेक प्रकारच्या काळ्या जादू करण्यात पारंगत असलेला त्याचा किमयागार सरदार वली. या वलीच्या किमयेच्या अनेक आख्यायिका अरबस्तानात पसरलेल्या होत्या. त्याच्या तिलिस्मचा तोड कोणाकडेही नाही, अशी त्याची कीर्ती असल्यामुळे भले भले लोक त्याला वचकून असत. 

सगळे सरदार आणि  मुख्यतः वली दालनात आल्यावर इब्राहीमने आपल्या हातात एक शाईची दौत घेतली. त्या नकाशावर त्याने शाईचा मोठा थेंब उडवला. तो थेम्ब हळू हळू पसरत पसरत वाढून मोठा झाला. इब्राहीमने दाढी कुरवाळली आणि सगळ्यांकडे कटाक्ष टाकत घोषणा केली.

" समशेरबहाद्दर रझाक, अब्दुल, साजिद, वाहिद आणि वली - जो कोणी मला खेदिरा प्रांत आपल्या साम्राज्याला जोडून देईल, त्याच्या हातात या शाईच्या डागाइतका प्रदेश मी देऊन टाकेन...तिथली सगळी कमाई त्या समशेरबहाद्दरांची असेल. शिवाय माझ्या मोठ्या मुलीशी त्याचा निकाह लावून मी त्याला माझा जावई करून घेईन...या पाक किस्व्याची कसम, परवारदिगार साक्षी आहे कि मी जे बोललो आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे..."

सरदारांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली. त्यांच्या तोंडाला पाणी सुटला असला, तरी आपल्याला कोणत्या दिव्यातून जावं लागेल याची त्यांना कल्पना होती. इतर प्रांत असते तर त्यांना पैजेचा विडा उचलायला एक क्षणही विचार करावा लागला नसता, पण इथे मात्र त्यांची अब्रू चव्हाट्यावर टांगली जायचा धोका स्पष्ट दिसत होता. बराच वेळ टोलवाटोलवी करून अखेर प्रत्येकाने आपली असमर्थता अनिच्छेने का होईना, पण बोलून दाखवली आणि एक एक करत ते तिथून निघून गेले. शेवटी एकटा वली त्या दालनात इब्राहिमबरोबर उरला. 

" हुजूर,एक दरख्वास्त आहे. मी जे सांगेन, ते तुम्ही नीट ऐकलं, तर तुम्हाला तुमच्या हातात हा प्रांत अंत येऊ शकतो...पण आपल्या मनातल्या दोन इच्छा मी पूर्ण करू शकणार नाही...त्यातली एकाच पूर्ण करू शकेन..." वलीने डोळे मिचमिचे करत इब्राहिमला सांगितलं. इब्राहिम आपल्या आसनावर बसला आणि त्याने वलीला अभय दिलं. वली काय बोलतोय, हे त्याने ध्यान देऊन ऐकायला सुरुवात केली. 

वलीने आपल्या डोळ्यातला सुरमा बोटाला लावला आणि ते बोट इब्राहिमसमोर धरलं. " मेरे आका, माझ्या बोटाला काळा धब्बा लागला आहे, तो मी आता या हिऱ्याच्या अंगठीला लावतो. आता अंगठी काळी झाली....आता मला सांगा, अशा काळ्या अंगठीसाठी तुम्ही किती अश्रफी द्याल? " 

" पता नही...कदाचित मी ती घेणार सुद्धा नाही..."

" तेच....ती यास्मिन बेगम तिच्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर आपल्यासमोर बेमुरव्वत होऊन उभी आहे....तिच्या सौंदर्याचे कसीदे अरबस्तानात पढले जातात म्हणून आपल्याला वेळोवेळी तिने जलील करण्याची गुस्ताखी केली आहे...त्या सौंदर्याला आपण नष्ट केलं तर तिचा गुरुर चूर चूर होईल...मग तिच्या प्रांतावर आपलं राज्य प्रस्थापित करणं किती सोपं जाईल...."

" वली, तुझा सुझाव दुरुस्त आहे...पण मला तिला माझ्या जनानखान्यात बघायचंय....तिला विद्रुप करून तिचा गुरुर तुटेल, पण आमच्या काळजाला किती यातना होतील तिचा तास चेहरा बघताना..."

" हुजूर, तेच तर मी म्हंटलं...या तो आप हुस्न की चाह कुर्बान करो या अपना खेदिरा जीतने का ख्वाब..."

" वली, मला फक्त काही क्षण त्या सौंदर्यवतीला माझ्या बाहुपाशात घ्यायचं आहे...तू माझ्यासाठी त्या काही क्षणांचा  बंदोबस्त करू शकलास तर मी तुझ्या पुढच्या सगळ्या गोष्टींना होकार द्यायला तयार आहे...कुछ पल का बंदोबस्त कर दे..." इब्राहीममधला स्खलनशील पुरुष आता जागा झाला होता. त्याच्या स्त्रीलंपट स्वभावाची कल्पना असल्यामुळे वलीला हे अपेक्षित होतंच.

" हुजूर, माझ्याकडे एक जादुई दवा आहे. इत्तरसारखी ती तुम्ही कोणत्याही स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही अंगाला लावली, तर ती स्त्री तुमच्या इच्छेची गुलाम होईल...पण एकदाच. त्यानंतर ती दवा नाकाम होईल....तिचा असर आकाशात जितका वेळ सूरज आणि चांद एकत्र असतात, तितका वेळच राहतो....पण असर संपल्यावर ती दवा त्या स्त्रीची खुबसूरती आणि जवानी तिच्याकडून काढून घेते. नंतरचं आयुष्य ती स्त्री आईन्यासमोर उभी राहू शकत नाही हुजूर...तिचा गुरुर आणि घमंड चूर चूर होऊन जातो..." वली आपले दात विचकून हसला. त्याचे तपकिरी डोळे आता अजून मिचमिचे झाले होते.  

इब्राहिम मनातल्या मनात अतिशय खुश झाला होता. त्याला डोळ्यासमोर आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं. त्याला मुळात यास्मिनबरोबर आयुष्य घालवण्यात काहीही रस नव्हता. रोज जनानखान्यात वेगवेगळ्या अप्सरांबरोबर कामक्रीडा करणाऱ्या इब्राहिमला फुलाचं जतन करून त्याचा दीर्घकाळ सुवास घेण्यापेक्षा ते एकदाच चुरून त्याच्या सुवासाचा घमघमाट यथेच्छ अनुभवण्यात जास्त आनंद मिळत होता. त्याने लगेच वलीकडून ती अत्तराची कुपी घेतली आणि वलीला दुसऱ्या दिवशी आपल्या बक्षिसाचा खलिता घेऊन जायला सांगितलं. शिवाय काही महिन्यांनी आपल्या मुलीचं लग्न वलीशी लावून द्यायचं त्याला आश्वासनही दिलं. 

तीन-चार दिवस नीट विचार करून इब्राहीमने आपली योजना आखली. आधी यास्मिनला आपण भेटायला येत असल्याची वर्दी द्यायची, नंतर तिच्या महालात संध्याकाळच्या वेळी गुप्ता मसलतींच्या बहाण्याने एकांतात तिला भेटायचं ,आपलं इप्सित साध्य करून दुसऱ्याच दिवशी तिला सगळ्या जनतेसमोर आणून त्यांना धक्का द्यायचा आणि त्या प्रांताचा नवा भाग्यविधाता म्हणून स्वतःला घोषित करायचं असा त्याचा मनसुबा होता. सगळ्या शक्यता नीट तपासून घेऊन अखेर त्याने आपल्या दूताला खलिता घेऊन यास्मिनच्या दरबारात पाठवलं. 

दोन दिवसांनी दूताने होकारार्थी उत्तर आणलं आणि इब्राहिम आनंदाने हरखून गेला. त्याच्या मनासारखे फासे पडत होते. त्या होकारार्थी खलित्याबरोबर यास्मीनने इब्राहिमला एक पांढराशुभ्र अरबी घोडा आणि सोन्याची कट्यार पाठवली होती. हा सगळं प्रकार बघून त्याची मुख्य बेगम हुस्ना मनोमन यास्मिन आणि आपल्या नवऱ्याला शिव्याशाप देत होती. कोण जाणो. चुकूनमाकून खरोखर आपला नवरा यास्मिनला राजी करून बेगम म्हणून घेऊन आला, तर आपलं महत्व एका क्षणात कस्पटासमान होईल या भीतीने तिने आडून आडून नवऱ्याला परावृत्त करायचा प्रयत्न करून बघितला. इब्राहीमने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण भुणभुण वाढल्यावर त्याने तिला समजावण्यासाठी दुसरी शक्कल लढवली. 

" बेगम, तू माझी पट्टराणी आहेस. मी यास्मिनशी निकाह करणार नाही हे तुला मी अनेक वेळा सांगितलं...तिने माझा प्रस्ताव इतके वेळा नाकारलेला आहे की अशा घमेंडखोर स्त्रीला मी माझ्या राणीच्या जागेचा मान देऊच शकत नाही...पण तरीही तुला विश्वास नसेल, तर मी परत येईपर्यंत मी माझ्या या साम्राज्याच्या सम्राटपदाची गादी तुझ्या हातात देऊन जातो....मी परत आल्यावर जर तुला यास्मिन माझी बेगम म्हणून आलेली दिसली तर तू मला वाटेल ती शिक्षा दे...." 

हुस्नानें हे ऐकून स्वतःला सावरलं. तशा पद्धतीने रीतसर सहीशिक्क्याचं राजेशाही फर्मान तिने लिहून घेतलं. इब्राहीमने आपल्या सरदारांना सगळीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सांगितलं आणि अखेर आपल्या निवडक फौजेसह तो आपल्या महालातून खेदिरा प्रांताकडे निघाला. वाळवंट तुडवून त्याचे घोडे शक्य तितक्या वेगाने आगेकूच करत होते. एक एक प्रहार सरत चालला होता तसा इब्राहिमच्या मनात अधीरपणा वाढत होता. चार दिवसांनी अखेर तो आणि त्याचं ते घोडदळ खेदिराच्या वेशीपाशी येऊन थांबलं. 

इब्राहिमच्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच थाटामाटात त्याचं स्वागत झालं. त्याच्या सैन्याला आलिशान तंबूंमध्ये मेजवानी दिली गेली. त्याला स्वतःला खेदिराच्या मुख्य वजीर असलेल्या अफरोज नावाच्या अतिशय सुंदर अशा स्त्रीने जातीने सम्राज्ञी यास्मिनच्या महालाच्या अंतःपुरात नेलं. तिथे उंची वस्त्रालंकार नजराणा म्हणून पेश करून तिने त्याचं राजेशाही स्वागत केलं. फलाहार झाल्यावर तिने त्याला हमामखान्यात जाऊन तयार व्हायला सांगितलं. त्या हमामखान्यात अत्तराने सुगंधित केलेल्या पाण्याने अंघोळ करता करता इब्राहिमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. आजच्या भेटीसाठी खास तयार करून घेतलेले कपडे घालून अखेर तो मसलतीच्या दालनासमोर आला. त्यांच्याकडची शस्त्रं बाहेर उभ्या असलेल्या रक्षकांकडे देऊन त्याने दालनात प्रवेश केला.कमरेला खोचलेली अत्तराची रत्नजडित कुपी आणि हातात धरलेली झमझमच्या पाण्याची बाटली ठेवलेली रत्नजडित पेटी याशिवाय त्याच्याकडे काहीही नव्हतं. 

काही क्षणात समोरून पैंजणांचा मोहक आवाज आला आणि इब्राहीमने नजर त्या दिशेला वळवली. लोकांकडून ऐकलेल्या वर्णनापेक्षा शतपटींनी जास्तच लावण्यवती असलेली, गोर्यापान नितळ कांतीची, निळसर हिरव्या डोळ्यांची, कमनीय बांध्याची तेजस्वी अशी ती सम्राज्ञी यास्मिन त्याच्यासमोर उभी होती. झिरझिरीत कपड्याने तिने आपला डोळ्यांखालचा चेहरा झाकलेला असला, तरी त्या कपड्यातून अंधुकसा दिसणारा जिवणीचा भाग तिच्या चेहेऱ्याचा अंदाज येण्यासाठी पुरेसा होता. परवारदिगारने आपल्या हाताने खास घडवलेली ही स्त्री खरोखर अरबस्तानातल्या कोणत्याही स्त्रीपेक्षा कित्येक पटींनी जास्त सुरेख होती. 

इब्राहिम काही सेकंद स्तिमित होऊन तिच्याकडे बघत राहिला. त्याला आपण कुठे आहोत, कोणासमोर आहोत याच भान उरलं नाही. अखेर यास्मीनने त्याला स्थान ग्रहण करण्याची विनंती केल्यावर तो भानावर आला. सूर्य बाहेर मावळतीला यायला लागला होता. काही क्षणात त्या जादुई दव्याचा असर सुरु होण्यासाठीची वेळ होणार होती. काही क्षण अघळपघळ गप्पा मारल्यावर अखेर इब्राहीमने मुख्य मुद्द्याला हात घातला. 

" शेहजादी, तुमचा दीदार व्हावा अशी अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. माशाल्लाह, आपण किती खूबसूरत आहात याच वर्णन मी आजवर ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात तुम्हाला बघून मी ते सगळं वर्णन किती मामुली होतं याचा प्रत्यय मला येतोय...अल्फाझ कमी पडतील तुमचं वर्णन करताना...आपण आमचा निकाहचा प्रस्ताव अनेक वेळा झिडकारला असला, तरी आम्ही आपल्याला माफ करून आपल्या राज्याशी मैत्री बरकरार ठेवण्याचा प्रस्ताव घेऊन खुद्द आलो आहोत. "

" हुजूर, गुस्ताखीकरिता माफी मागून सांगते, आम्ही निकाहसाठी अजून राझी नाही आहोत कारण आम्हाला अजून त्याबद्दल विचार करायचा नाही. आपल्यासारख्या अरबस्तानच्या सम्राटांशी मैत्री करण्याला आमची काही हरकत कशी असेल...आपका सुझाव सर आँखों पे..."

" जर तसं असेल, तर माझ्याकडून पवित्र झमझमच्या पाण्याची ही भेट स्वीकार करावी..." 

" जरूर...आणि आपण आमच्याकडून आमच्या शाही कलाकारांनी काढलेली हुझुरांची प्रतिमा म्हणून हे चित्र स्वीकार करावं..." इब्राहिमला यास्मीनने सोन्याच्या चौकटीत डकवलेलं त्याचं तैलचित्र भेट म्हणून दिलं.

" आमच्या प्रांतात आमच्या खास कारागिरांनी तयार केलेलं एक बेशकिमती अत्तर मी आणलेलं आहे...आपल्या सौंदर्याला चार चांद लावण्याचं काम हे अत्तर करेल यात आम्हाला शंका नाही...आपली इजाज़त असेल तर आम्ही आपल्या मनगटावर हे सुगंधी अत्तर लावण्याची गुस्ताखी करू शकतो का?" इब्राहीमने कमरेची कुपी काढत प्रश्न केला. 

" जरूर...आमच्याकडेही खास मिस्रच्या खास लोकांनी आमच्यासाठी पाठवलेलं शरबत आहे...आपली इजाज़त असेल तर आम्ही आपल्याला ते शरबत देऊ शकतो का?"

इब्राहिमला आता आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याने आपल्या अत्तराचे चार थेंब यास्मिनच्या नाजुकशा मनगटावर लावले. स्वतः हातात तिने दिलेल्या सोन्याच्या रत्नजडित पेल्यातून त्याने ते सरबत प्रश्न करायला सुरुवात केली. काही मिनिटात त्याला ते 'सरबत' चढायला लागलं आणि त्याने यास्मिनला आपल्याकडे ओढलं. ती त्याला वश झालेली असल्यामुळे तिने काहीही आढेवेढे ना घेता स्वतःला त्याच्याकडे सुपूर्द केलं. पुढचा तासभर त्या दालनात येणारा प्रकाश कमी कमी होत गेला आणि अखेर सूर्य पूर्णपणे मावळून चंद्र आकाशात तेजस्वी झाल्यावर दोघे भानावर आले. 

इब्राहिमला तिने भानावर आल्यावर केलेल्या स्मितहास्याने काही सेकंद बुचकळ्यात टाकलं. त्याच्या अंदाजानुसार तिच्याकडून अतिशय तिखट प्रतिक्रिया येईल आणि कदाचित ती आपल्या सेवकांना बोलावून आपल्याला कैद करेल अशी त्याची अटकळ होती, पण तसं काहीही नं झाल्यामुळे तो थोडासा गोंधळला. त्याला आता हळू हळू तिच्या शरीरात होणार बदल दिसू लागला. दालनात एकही आरसा नसल्यामुळे त्याला थोडं हायसं वाटलं. योजनेनुसार त्याच्या महत्वाच्या सैनिकांनी महालाबाहेर मोक्याच्या जागा हेरून ठेवल्या आणि ते सकाळ व्हायची वाट बघत जगात राहिले. महालात यास्मिनच्या दासींनी इब्राहिमला त्याच्यासाठी सजवून ठेवलेल्या खास शयनकक्षात नेलं. रात्री मनातल्या मनात आपल्या यशाचे मांडे खात इब्राहिम नुसताच लोळत राहिला. 

बाहेर तांबडं फुटायला लागलं तसं इब्राहीमने आपल्या शयनकक्षाच्या सज्जात जाऊन खुणेचा पलिता पेटवला. त्याचे सैनिक हळूच आपापल्या जागी जाऊन उभे राहिले. सकाळ झाली तशी महालात हलकल्लोळ माजल्याची जाणीव इब्राहिमला झाली. तो मुद्दाम कक्षाबाहेर आला आणि यास्मिनच्या कक्षाच्या दिशेने पुढे गेला. त्याच्या काही सैनिकांनी महालात प्रवेश केला. आपल्या सम्राटाच्या मागे येऊन ते उभे राहिले. इब्राहीमने समोर यास्मिनला येताना बघितलं आणि तो सावध झाला. 

निस्तेज, शरीरावर सुरकुत्या पडलेली, केस पांढरे झालेली आणि कमरेत किंचित वाकलेली एक वृद्ध स्त्री होऊन यास्मिन त्याच्या समोर उभी होती. इब्राहिमला ते बघून आनंद झाला. तिच्या त्या अवस्थेमुळे त्याचा अहंकार सुखावला. त्याने दाढी कुरवाळली. यास्मिन आपल्याकडे डोळे विस्फारून बघत आहे, हे त्याला समजत होत. कदाचित तिच्या तोंडातून एकही शब्द फुटणार नाही, तेव्हा आपणच तिला आता तिच्या राज्यातल्या लोकांसमोर आणून तिचं नवं रूप सगळ्यांसमोर उघड करावं, या उद्देशाने त्याने तिचा हात पकडला. त्याच्या आणि यास्मिनच्या सैनिकांमध्ये झटापट सुरु झाली. यास्मिनचा हात धरून इब्राहिम महालाच्या समोरच्या बाजूला असलेल्या विशाल सौधाकडे जायला लागला. तिथून समोर अक्ख नगर दिसत असल्यामुळे त्याला ती जागा आपल्या पुढच्या कृतींसाठी सुयोग्य वाटत होती. यास्मीनने काहीही प्रतिकार केलं नाही. 

अखेर सौधाकडच्या बाजूला असलेल्या दरवाजापाशी तो थांबला. यास्मिनचा हात सोडून त्याने आपला पेहेराव ठाकठीक केला. बोटातली अंगठी नीट करताना त्याला अचानक आपल्या बोटांचा आकार आक्रसल्यासारखा वाटला. शिवाय हाताच्या शिरा आता चांगल्याच वर आलेल्या दिसत होत्या. त्याने गोंधळून मागे आपल्या शिपायांकडे बघितलं. शिपाई त्याला बघून अचानक पिशाच दिसल्यासारखे भांबावले. त्यांची तोंडं तशीच उघडी राहिलेली बघून इब्राहीमने आजूबाजूला नजर टाकली. बाजूच्या भिंतीवर एक भाला मोठा आरसा होता. त्यात त्याला आपली प्रतिमा दिसली......

स्वतःची प्रतिमा बघून इब्राहिम हादरला. त्याचीही अवस्था यास्मिनसारखी झाली होती. पिकलेली दाढी, खप्पड झालेले गाल, खोल गेलेले डोळे, शरीर कृष्ण झाल्यामुळे ढगाळ झालेले कपडे अशा अवस्थेतली आपली प्रतिमा बघून त्याने आक्रोश सुरु केला. यास्मिनला त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. तिने त्याला शांतपणे वस्तुस्थिती सांगितली. इब्राहिमच्या धोक्यापासून आपल्या राज्याचं कायमचं रक्षण करण्यासाठी तिने आदल्या सायंकाळी त्या सरबतातून इब्राहिमला जादुई दवा पाजली होती. ज्या मिस्र देशातून वलीने आणलेली दवा इब्राहीमने यास्मिनचा सौंदर्यपात करण्यासाठी वापरली होती, त्याच मिस्र देशातून अफरोजने आणलेली जादुई दवा यास्मीनने इब्राहिमला पाजून त्याच्या तारुण्याचा नाश केला होता. याआधी त्याने पाठवलेल्या निकाहच्या प्रस्तावांच्या प्रकरणामुळे यास्मिनची खात्री पटलेली होती, की एक ना एक दिवस इब्राहिमसारखा कपटी आणि शक्तिशाली सम्राट आपल्या प्रांताचा लचका तोडल्याशिवाय राहणार नाही...अर्थात त्याच्या सैन्याशी चार हात करण्यात काहीच हाती लागण्याची शक्यता नसल्यामुळे यास्मीनने शेवटी त्याचा भेटीचा प्रस्ताव स्वीकारून त्याच्यावर जादूच्या दव्याच्या प्रयोग करायची योजना आखली होती.   

खेदिरा प्रांतांच्या जनतेने आपल्या सम्राज्ञीला तशा अवस्थेतही खुल्या दिलाने स्वीकारलं. इब्राहिम मात्र झाल्या प्रकारामुळे खचला. त्याच्या मनाची आणि शरीराची झालेली अवस्था इतकी भीषण होती, की त्याला नैराश्याचा झटका येऊन तो ठार वेडा झाला. अशा अवस्थेत त्यानेच नेमून दिलेल्या नियमानुसार हुस्ना त्याच्या साम्राज्याची राणी झाली आणि तिने इब्राहिमच्या कपटी आणि धूर्त सरदारांना कैद केलं. वलीला त्याच्या कुकर्मांची सजा म्हणून तिने देहदंडाची शिक्षा फर्मावली. 

अरबस्तानाचं ते साम्राज्य आता एका सुयोग्य आणि कर्तृत्ववान स्त्रीच्या हाताखाली सुरक्षित झालं आणि वेगळ्या अर्थाने ते एकसंध झालं...कारण यास्मीनने आपला प्रांत स्वखुशीने हुस्नाच्या हाती सोपवला. अरबस्तानाच्या इतिहासात हुस्ना एक शक्तिशाली आणि कर्तव्यकठोर शासक म्हणून प्रसिद्ध आहे...आणि तिच्या बखरीत एक सोनेरी पान यास्मिन नावाच्या स्त्रीचं आहे आणि त्या बखरीच्या शेवटी तिच्या साम्राज्याचं राजचिन्ह आहे - एक आरसा आणि त्यात लिहिलेलं अल्लाहचं नाव ! 

Comments

Popular posts from this blog

मुहारीब

भ्रम

सफर