मुहारीब
अहमद आणि त्याचे खास सरदार अहमदच्या मातीच्या गढीमध्ये मुख्य खलबतखान्यात एकत्र जमले होते. अडीचशे-तीनशे कुटुंबांची ती टोळी अरबस्तानाच्या एका मोठ्या ओऍसिसच्या आजूबाजूला ऐसपैस पसरलेल्या सालेम गावामध्ये सुखाने राहत असली, तरी आजूबाजूच्या अनेक छोट्या मोठ्या टोळ्यांनी त्यांना हैराण करून सोडलं होतं. गोड्या पाण्याचा भाला मोठा स्रोत, खजूर, ऑलिव्ह, अंजीर, डाळिंब अशा अनेक फळांच्या बागा, बारमाही पाणी असल्यामुळे पिकू शकणारे भाज्यांचे मळे आणि दूधदुभत्यामुळे आलेली समृद्धी यामुळे ते गाव आसपासच्या अनेक टोळ्यांना आपल्या आधिपत्याखाली आलेलं हवं होतं. गावात वर्षानुवर्षे चालत आलेली कलेची परंपरासुद्धा इतकी समृद्ध होती, की तिथे तयार होणारे गालिचे, चटया, चित्रं आणि लाकडी खेळणी दूरदूरच्या बाजारात विक्रीसाठी जात होती. गावाची सुसज्ज फौज जरी नसली, तरी या गावावर चालून आलेली कोणतीही टोळी कधीही पुन्हा दिसली नाही, अशी त्या परिसरात आख्यायिका होती. अहमदला आज आपल्या खलबतखान्यात एका महत्वाच्या विषयावर आपल्या मुख्य सरदारांना सावध करायचं होतं. गावापासून काही अंतरावर खलिसी टोळीच्या लोकांनी बाजारातून चाळीस उमदे घोडे खरेदीची...