वादी
अली आणि फाझल आपल्या उंटांना शक्य तितक्या वेगात दौडवत होते. तीन दिवसांपूर्वी मिस्र देशातल्या बाजारात त्यांनी आपला माल चांगल्या चढ्या किमतीला विकला होता. खिशात अपेक्षेपेक्षा जास्त माल खुळखुळत होता. या वेळच्या व्यापारात त्यांना चांगलाच धनलाभ झाल्यामुळे त्यांनी घरच्यांसाठी हात सैल सोडून खरेदी केली होती. परतीच्या वाटेवर ठराविक अंतरावर असलेल्या वस्त्या त्यांच्या परिचयाच्या होत्या. सवयीप्रमाणे पहाटे तांबडं फुटल्या फुटल्या प्रवासाला सुरुवात करायची, दुपारी खाण्यापिण्यासाठी वाटेतल्या माहितीच्या वस्तीत थांबायचं, पुन्हा दुपारपासून संध्याकाळपर्यंत प्रवास आणि रात्री पुढच्या वस्तीत रात्र काढायची असं त्यांच्या प्रवासाचं आयोजन असायचं. प्रवासातल्या शेवटल्या टप्प्यात आपल्या गावापासून सहा-सात तासांच्या अंतरावरची सवयीची वस्ती त्यांना जरा जास्त प्रिय होती. ती वस्ती चार-पाच गावांपासून जवळ असल्यामुळे तिथे खाण्यापिण्याची आणि आरामाची सुरेख सोया होती. तिथल्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन व्यापाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या वस्तीवर अवलंबून असल्यामुळे त्या गावात पाहुण्यांची चोख बडदास्त ठेवली जाई. अशा या ग...