पाताळभैरव

सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होत. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.

ओमार या गावात जन्माला आला, वाढला आणि तिथेच त्याचं कुटुंबदेखील वाढलं. त्या गावची संस्कृती अशी होती, की कोणीही कोणालाही मदतीला नाही म्हणत नसे. या ओमारकडे सुद्धा असाच एके दिवशी कोणीतरी वाटसरू आला . "आपण मक्केला जात आहोत आणि निवाऱ्यासाठी जागा शोधत आहोत "या त्याच्या बोलण्यामुळे ओमार  त्याची मदत करायला तयार झाला. त्याने त्याला आपल्याच घराच्या एका खोलीत छान जागा करून दिली आणि नीट खाऊ-पिऊ घातलं. दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेवर जायला निघाल्यावर त्या वाटसरूला ओमारने २-३ दिवस पुरेल इतकं खाण्याचा जिन्नस बांधून आणि पाणी पखालीत भरून दिलं. तो वाटसरू त्या आदरातिथ्याने भारावला आणि त्याने ओमारला विचारलं," तू माझी इतकी बडदास्त ठेवलीस, त्यामुळे मला तुला काहीतरी देणं भाग आहे,पण अल्लाहच्या दरबारात मी उपकारांची ओझं घेऊन कसा जाऊ?तू माग तुला काय हवाय ते, मी देईन" 

हा भटका भणंग वाटसरू आपल्याला काय देणार, याचा ओमर विचार करत होता. मागणं त्याला कससंच वाटत होत आणि त्या वाटसरूचा आग्रहही मोडवत नव्हता. शेवटी " मला तुम्ही यथाशक्ती असं काहीतरी द्या, जे मी सोडून कोणालाच मिळू शकणार नाही" अशा मोघम शब्दात त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. त्या वाटसरूने झोळीत हात घालून एक मोठी लोखंडी चावी काढली आणि ती त्याने ओमारला दिली.

" ही चावी इथून उत्तर दिशेला एक बारिद लांब ( १ बारिद = २३ किलोमीटर ) असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाची आहे. तो दरवाजा थेट पाताळलोकाच्या रस्त्याचा दरवाजा आहे. त्याचं रक्षण करणारे 'इफरीत' ( एक प्रकारचं पिशाच्च ) तुला आत येऊ देणार नाहीत, पण त्यांना तू जिंकलंस तर पाताळलोकात तू कधीही येऊ जाऊ शकशील."ओमार त्यावर काही बोलणार तोच तो वाटसरू तिथून झपझप पावलं टाकत निघून गेला.

पाताळलोकाची चावी आपापल्या हातात आहे हे ओमारला आधी खरं वाटत नव्हतं, पण मक्केला जात असलेल्या एका नेक सीराच्या तोंडून खोटंनाटं निघणार नाही अशी त्याची खात्री होती. तो सीर फाटका असला तरी अल्लाहची  मनोभावे खिदमत करणारा वाटत होता. शेवटी विषाची परीक्षा घ्यायचा त्याने निर्णय घेतला आणि व्यापाराच्या निमित्ताने आपण १-२ महिने बाहेर जाणार आहोत असं सगळ्यांना सांगून तो त्या डोंगराच्या दिशेला निघाला. त्याच्याकडे सामान वाहून न्यायला फक्त एक खेचर असल्यामुळे त्याचा प्रवास झपझप होणं शक्य नव्हतं. मजल दरमजल करत ते वैराण वाळवंट तुडवून त्याने ३-४ दिवसात एकदाचा तो डोंगर गाठला. एक अक्खा दिवस शोधाशोध केल्यावर त्याला एका वाळूच्या ढिगाखाली एक दरवाजा सापडला आणि त्याच्या अंगावर आनंदाने गुलाबपाणी शिंपडलं गेलं.

आता हा दरवाजा कसा उघडायचा आणि इफरीतला कसं तोंड द्यायचं, याची त्याने मनातल्या मनात उजळणी केली. आपल्या बायको-मुलांची आठवण काढून बरंवाईट झालं तर त्यांची काळजी घे म्हणून विधात्याला करुणा भाकली आणि धडधडत्या छातीने त्याने त्या दरवाज्याला हात घातला. चावी दोन वेळा फिरवल्यावर त्या दरवाज्याचा अक्राळविक्राळ आवाज झाला आणि तो सताड उघडला. आत चक्क अंधार गुडूप होतं. दरवाज्याच्या आत सूर्याची किरणं शिरतंच नव्हती. आत डोकावल्यावर त्याला काहीही न दिसल्यामुळे तो थोडासा हिरमुसला. मशाल पेटवून त्याने दरवाज्याच्या आत डोकावायचा प्रयत्न केला. त्याच्या मशालीच्या प्रकाश दाराच्या आत पडतच नव्हता हे त्याच्या लक्षात आलं. दाराच्या आत जणू काही प्रकाशाला यायला मनाई होती. या सगळ्यामुळे आत पाऊल ठेवायचं की नाही, अशा विचारात त्याची पुढची काही मिनिटं गेली आणि शेवटी जे होईल ते बघितलं जाईल अशा हिकमतीने त्याने पुढे जायचा निर्णय घेतला.

चार पावलं गुहेत शिरून त्याने हाताने आजूबाजूच्या भिंती चाचपल्या. जमिनीचा अंदाज घेतला. अखेर मनाचा हिय्या करून त्याने इफरीतच्या नावाने हाका मारल्या. दोन मिनिटं शांतता झाली आणि आतून एक खणखणीत आवाज आला, " तू  जो कोणी आहेस, नीट एक. आत यायचा एकाच रस्ता आहे. जमीन संपेपर्यंत आत चालत ये आणि जिथे जमीन संपल्याचं जाणवेल, तिथे विश्वासाने उडी मार.....तुला काहीही होणार नाही. पण माझ्या एका अटीबद्दल आधीच तुला कल्पना देतो... मी तुला तीन प्रश्न विचारणार. त्यांची समाधानकारक उत्तरं तू देऊ शकला नाहीस तर तुला मी परत जाऊ देणार नाही. उत्तरं समाधानकारक नसतील तर मी सांगेन ती शिक्षा तुला भोगावी लागेल आणि खोटी असतील तर तुला वर्षानुवर्षे माझ्या या गुहेत खितपत पाडाव लागेल..." 

ओमारने अल्लाहचे नाव घेतलं, मशाल टाकली आणि पुढे चालायला सुरुवात केली. जिथे जमीन संपल्याचं जाणवलं, तिथे त्याने त्या खोल पोकळीत उडी मारली. पूर्णपणे अंधार असलेल्या त्या गुहेत तो झपाट्याने खाली जात होता. थोड्या वेळाने अलगद त्याचे पाय जमिनीला टेकले आणि अचानक त्याला समोरचं दिसू लागलं. समोर एका हाडांनी आणि कवट्यांनी तयार केलेल्या सिहासनावर एक आकृती बसलेली होती. त्या आकृतीच्या डोळ्यांच्या जागी लाल रंगाचे दोन ठिपके होते आणि हातात एक हाडांनी तयार केलेला दंड होता. त्या आकृतीला स्वरूप नव्हतं.डोक्यावर दोन शिंग तेव्हढी स्पष्ट दिसत होती.

" तुला अंधारात दिसतंय कारण मी तुझ्या डोळ्यांना तशी शक्ती दिलीय....  इथे माझ्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी इफरीत, या पाताळाचा सर्वेसर्वा. माझ्याबरोबर चांगले आणि वाईट जिन्ना आहेत, ते तू खरं बोलतोयस कि खोटं, ते मला सांगतील. तू मला कबूल केल्याप्रमाणे माझे प्रश्न आता मी तुला विचारणार आहे."

ओमारने डोळे मिटले, अल्लाहच नाव घेतलं आणि प्रश्न ऐकायला तो तयार झाला.

"अशी कोणती गोष्ट आहे, जी वाटल्यावर वाढते?"

"चांगली दुआ"

" कितीही लांब जाऊनही कोणापासून आपलं अंतर कमी होत नाही? "    

"आई आणि वडील"

"ज्याने तुला हि चावी दिली, त्या सीर चा नाव काय?"

"मी विचारलं नाही...एक मक्केला जाणारा वाटसरू म्हणून मी यथाशक्ती त्याला मदत केली...याहून जास्त त्याच्याबद्दल मला माहित नाही..."

इफरीत जागेवरून उठला, त्याने आपले हात वर केले आणि त्या अंधाऱ्या जागेत लक्ख प्रकाश पडला. गुहेत सोना-नाण्यांचा खच होता. भरपूर फळफळावळ होती आणि दुधाचा अखंड झरा वाहत होता. एक मधाचा तलाव होता. भिंतींवर अनेक जिन्ना लटकलेले होते.

"तू प्रामाणिक आहेस, मनाने साफ आहेस आणि नेक आहेस.....मी प्रसन्न आहे. काय हवं ते माग " इफरीतच्या आकृतीतून ओमारला कौतुकाचे शब्द ऐकू आले. 

ओमारने काय मागावं असं विचार केला. आपल्याकडे सगळंच आहे, नवीन मागावं या विचारात तो गर्क झाला. शेवटी त्या वाटसरूंकडे केलेलीच मागणी ओमारच्या तोंडून बाहेर आली...

"तुम्ही यथाशक्ती असं काहीतरी द्या, जे मी सोडून कोणालाच मिळू शकणार नाही "

इफरीत हसला. त्याने ओमारला वरदान दिलं, " माझ्या या गुहेच्या तोंडाशी दर आठवड्याला तुला सोन्याच्या पाच मोहोरा मिळतील. त्या फक्त तुलाच मिळतील.....जर त्या घ्यायला आलं तर त्याला मी पाताळात ओढून घेऊन माझ्या सिंहासनाखाली गाडून टाकेन "

ओमारने त्या वरदानाचा स्वीकार केला आणि इफरीतचे आभार मानले. आता पुन्हा गुहेत अंधार पसरायला लागला. ओमारला आपण आपोआप वर उचलले जात असल्याची जाणीव झाली.....तो आपोआप गुहेच्या दाराबाहेर आला आणि ते दार त्याला बंद झालेलं दिसलं.

गावात आल्यावर ओमारने सगळ्यांना आपल्याला त्या डोंगराच्या गुहेत खजिना सापडल्याचं सांगितलं आणि प्रत्येक आठवड्याला पाचच मोहोरा आणता येतील हेही सांगून टाकलं. आणलेल्या पाच मोहोरा त्याने गावात सगळ्यांसाठी काही ना काही करायच्या दृष्टीने जिरगामध्ये दान करण्याचं ठरवलं. प्रत्येक आठवड्यात तो पाच मोहोरा घेऊन यायचा आणि त्यातून गावाची सगळी कामं व्हायची. हळूहळू त्याला गावाने आपला गावप्रमुख नेमला आणि त्याच्या संमतीशिवाय गावात काहीही होऊ शकणार नाही असा ठराव केला. त्याच्या या ऐश्वर्याची आणि त्याला मिळू लागलेल्या मानाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. त्याचं हे वाढत प्रस्थ पाहून त्याच्या बरोबरीच्या काही तरुण मंडळींमध्ये हळू हळू त्याच्याबद्दल असूया निर्माण व्हायला लागली.  त्यातल्या एकाने - अहमदने शेवटी पुढाकार घेतला आणि सगळ्या समविचारी तरुणांना एकत्र आणून ओमारच्या खजिन्याची चावी काहीही करून हस्तगत करायची आणि त्याला मिळणारं महत्व कमी झालं की स्वतः जिर्ग्याचा ताबा घ्यायचा अशी योजना त्याने सगळ्यांसमोर पेश केली. ईर्ष्येने पेटलेली डोकी एकत्र आल्यावर जे व्हायचं तेच झालं आणि त्यांनी त्या योजनेवर काम करायला सुरुवात केली. 

ओमारने भोळसटपणे चावीबद्दल सगळ्यांना सांगितलेलं असल्यामुळे रात्री गाव झोपेत असताना हळूच ती चावी मिळवायची आणि पोबारा करायचा अशी योजना ठरली. त्या गुहेचा शोध लागताच आत घुसून आहे तो सगळा खजिना साफ करायचा आणि गावात येऊन आपल्या या पराक्रमाच्या मोबदल्यात जिरग्यात मोक्याच्या जागा पटकावून ओमारला कायमचा दूर करायचा त्या सगळ्यांचा मनसुबा होता. अहमद अर्थात सगळ्यांच्या पुढे होता. 

ठरल्याप्रमाणे अमावास्येच्या रात्री गुपचूप ओमारच्या घरात घुसून अहमदने आणि त्याच्या मित्रांनी ओमारच्या खोलीत ठेवलेली त्याची ती चावी पळवली आणि घोड्यावर बसून रात्रीच त्या डोंगराकडे प्रयाण केलं. सकाळी सगळा प्रकार समजल्यावर ओमारने जिरगा बोलावून सगळ्यांना झाल्या प्रकारची कल्पना दिली. ओमारव्यतिरिक्त कोणीही आलेला चालणार नसल्याच्या इफरीतच्या अटीबद्दल ओमारने आजवर कोणालाही सांगितलं नव्हतं.  गावातल्या कोणाकडून अशी आगळीक घडेल याची कल्पना नसल्यामुळे ओमारला आजवर त्याची आवश्यकताच भासली नव्हती. तो खुलासा होताच गावचे लोक हादरले. सगळ्यांनी काहीही करून अहमद आणि त्याच्या मूर्ख साथीदारांना थांबवायचं ठरवलं आणि आपापल्या गोद्यांवर मांड ठोकून गावातले अनेक लोक ओमारबरोबर वेगाने डोंगराच्या दिशेने निघाले.

अहमद आणि त्याचे चार साथीदार डोंगरापाशी पोचले होते. दार शोधायची घाई सगळ्यांना होती . त्यासाठी त्यांनी अक्खा डोंगर पालथा घातला. शेवटी एकदाचा तो दरवाजा त्यांना दिसला. अहमदने चावी काढून दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली. इतक्यात त्यांच्यातल्या एकाला दूरवर धुळीचे लोट दिसले. गावचे लोक आपल्या मागावर आलेले आहेत, याची त्यांना खात्री पटली. लवकरात लवकर दरवाजा उघडावा, मिळेल तो खजिना घेऊन तिथून पोबारा करावा आणि कोणत्यातरी लांबच्या गावात बस्तान बसवावं या अहमदच्या नव्या योजनेला सगळ्यांनी अनुमोदन दिलं.

ओमार दाराला चावी न लावायची विनंती ओरडून ओरडून करत होता. आजूबाजूचे लोक सुद्धा त्या सुरात सूर मिळवून त्यांना दाराला चावी लावण्यापासून रोखण्याचा सल्ला ओरडून ओरडून देत होते. ते दृश्य पाहून अहमद अजून घाबरला. दूरवरून तो आवाज स्पष्ट येत नसला, तरी सगळे जण आरडाओरडा करत आहेत हा अंदाज अहमद आणि त्याच्या त्या साथीदारांना आला. त्याचा अर्थ त्यांनी भलताच लावला. आपण त्यांच्या हाती लागलो तर आपली धडगत नाही, अशी भीती सगळ्यांना वाटायला लागली. त्या सहा जणांनी शेवटी घाईघाईत चावी त्या दाराला लावून दोन वेळा फिरवली....

वीज चमकावी तसा एक प्रकाशाचा लोळ तिथे तयार झाला. दार करकरून उघडलं आणि एक एक करत ते सहाच्या सहा जण त्या अंधाऱ्या पोकळीत नाहीसे झाले. चावी त्यांच्यामागोमाग आत पडली आणि दार बंद होऊन पुन्हा एका क्षणात त्यावर वाळू जमून ते दार दिसेनासं झालं. ओमर आणि इतर गावकरी हताशपणे घोड्यावरून उतरले . चार-पाच लोभी आणि स्वार्थी व्यक्तींमुळे अक्ख्या गावाचं झालेलं नुकसान त्यांना डोळ्यासमोर दिसू लागलं. त्या सगळ्या प्रकारात ती चावीसुद्धा नाहीशी झाली होती, त्यामुळे त्या दरवाज्याच्या आत जाण्याचे सगळे रस्तेच बंद झाले होते...अखेर हात हलवत सगळे जण परत गेले.

काही महिन्यात तोच वाटसरू परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा ओमारला भेटला. त्याच्याकडे पाहुणचार घेऊन सुखावला आणि दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा ओमारला तोच प्रश्न केला. ओमारने त्याला  तेच उत्तर दिले आणि त्या फकिराने झोळीतून अजून एक चावी काढली. ती चावी दक्षिणेकडे असलेल्या डोंगरातल्या इफरीतच्या दुसऱ्या गुहेची होती. ओमारने ती चावी घेतली, फकिराला निरोप दिला आणि दुसऱ्या दिवशी गावापासून लांब समुद्राच्या किनाऱ्यावर तो गेला. चावी काढून त्याने समुद्रात फेकून दिली. 

'फकिराला माझ्याकडे तितके वेळा पाठव जितक्या चाव्या त्याच्याकडे आहेत, म्हणजे मी त्या समुद्रात फेकून देईन!' परत आपल्या गावाकडे जात असताना ओमारने अल्लाहला प्रार्थना केली

त्याची प्रार्थना अल्लाहने ऐकली कि नाही कुणास ठाऊक, कारण पुन्हा तो फकीर त्या गावी कधीच आला नाही. आजसुद्धा त्या गावात येणाऱ्या प्रत्येकाला ओमारच्या आठवणींचं प्रतीक म्हणून गावच्या जिरग्याकडून एक चावी भेट म्हणून दिली जाते. त्या चावीवर लिहिलेलं असतं, ' नेकी कर आणि विसरून जा... '

Comments

Popular posts from this blog

मुहारीब

भ्रम

सफर