प्रस्तावना

राबता 

शुक्री आपल्या छोट्याशा दुकानात आपल्या चार-पाच मदतनीसांबरोबर चिंताक्रान्त अवस्थेत बसलेला होत. बरेच दिवस काही नवं काम नं मिळाल्यामुळे त्याच्याकडची पुंजी आता संपायच्या मार्गावर आलेली होती. मदतनिसांना महिन्याची तन्ख्वाह दिल्यावर त्याच्या गल्ल्यात जेमतेम एक-दोन आठवडे पुरतील इतकेच पैसे उरणार होते. वृद्ध अम्मी - अब्बा, तीन मुलं, सहा महिन्याची गर्भवती असलेली बायको आणि घरकामासाठी नेमलेली रशिदा नावाची मदतनीस अशा मोठ्या कुटुंबकबिल्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. काही वर्षांपासून त्याने गावाच्या मुख्य बाजारात इमारतींच्या दुरुस्तीचं आणि देखरेखीचं काम करायचं दुकानं थाटलं होतं. पहिली काही वर्षं त्याला आजूबाजूच्या गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण हळू हळू त्याच्यासारखे अनेक जण या उद्योगात पडले आणि स्पर्धा वाढून या धंद्याला एकूणच उतरती कळा आली. आता जवळ जवळ दोन-अडीच महिने नवं काम न मिळाल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली होती. 

" भाईजान, चिंता मतं किजीये...हम और इंतेजार करते है....जितनं पैसे है मिल बाट के चला लेंगे..." दुकानातला वाहिद आपल्या मालकाला धीर देत होता. बाकीच्यांनी आपापल्या परीने शुक्रीला आश्वस्त करायचा प्रयत्न केला. आपल्या मदतनिसांच्या मनाचा मोठेपणा बघून शुक्री अजून हळवा झाला. पण वस्तुस्थितीचा विचार करता नक्की आपल्याकडून कुठे चुका होत आहेत, हे काही त्याच्या ध्यानात येत नव्हतं. शेवटी त्याने गावच्या जुम्मा मशिदीतल्या मौलवी साहेबांना भेटून आपल्या मनातली कैफियत त्यांच्यासमोर मांडायचा निर्णय घेतला. 

" मौलवीजी, खूप तक्लीफ आहे...काय करायचं सुचत नाही....दो महिने गुजर गये...काम नहीं मिल राहा...." शुक्री आपल्या मनाची कवाडं मौलवी साहेबांसमोर खुली करत होत. " सुरुवात केली तेव्हा काम इतकं होतं की लोक कमी पडायचे...आज काहीच काम मिळत नाही...मी आजवर जकात भरण्यात कुसूर केला नाही....पाच वक्ताचा नमाज अदा करतो रोज....कोणाला फसवत नाही, कोणाला रिश्वत देत नाही आणि कोणाकडून घेत नाही....तरी माझ्यावर परवारदिगार नाराज का आहे? "

" बेटा, तुझा वाईट काळ चाललेला आहे....जे सगळं घडतंय त्यात तुझी काहीच चूक नाहीये...प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो..फिलहाल तुझ्यासारख्या नेक बंद्यासाठी  मी एक मदत करू शकतो....या मस्जिदच्य्या मरम्मतीचं काम मी तुला देऊ शकतो. कालच आम्ही मस्जिदच्या दीवार आणि फरशीच्या कामाबद्दल बोलत होतो...पैसा आहे, गरज आहे आणि आज अल्लाहने समोर योग्य तो बंदा आणून बसवलेला आहे...हे काम तुला काही दिवस पुरेल...तोपर्यंत आपण तुझ्या कामाच्या पुढच्या प्रगतीसाठी दुआ मागुया..." मौलवी साहेबांनी एकाच वेळी शुक्रीला मदतही केली आणि धीरही दिला. 

परवारदिगारचे आभार मानत शुक्री आनंदाने मशिदीबाहेर आला. आपल्या दुकानात येऊन त्याने सगळ्यांना ही खुशखबर दिली. सगळ्यांनी मनापासून त्याचं अभिनंदन केलं. सगळीकडे मशिदीचं काम मिळाल्याची खबर गेल्यावर आपोआप लोकांमध्ये दुकानाबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि ते कामासाठी दुकानात यायला लागतील, या आशेने शुक्रीने सगळ्यांना मनापासून व्यवस्थित काम करण्याची विनंती केली. त्याने स्वतः जातीने कामाच्या ठिकाणी दिवसभर ठाण मांडायचं ठरवलं आणि आपल्या दुकानाबाहेर त्याने तशा माहितीची भली मोठी पाटी लावून दुकानाला टाळं ठोकलं. 

पहिल्या दिवशी फरशीच्या आणि भिंतींच्या मोजमापनात सगळ्यांनीच जोर लावला आणि साधारण किती माल मरम्मतीसाठी मागवावा लागेल याची यादी तयार केली. मौलवी साहेबांची मंजुरी घेऊन शुक्रीने आपल्या पाचही मदतनिसांना सामान आणायला धाडलं. स्वतः शुक्री मशिदीत हातात फावडं आणि कुदळ घेऊन जुनी फारशी उखडायला लागला. मौलवी साहेबांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि ते स्वतःच्या घरी परतले. 

शुक्रीने दोन-अडीच तासात  मशिदीच्या मध्यापर्यंतची फारशी उखडून बाजूला केली होती. त्याच्या पाठीला रग लागल्यामुळे तो अखेर जमिनीवर बसला. हातातल्या कुदळ-फावड्यावर लागलेली माती त्याने झटकली आणि डोक्याला बांधलेला कपडा सोडून त्याने हात-तोंड धुतलं. थोडा वेळ पाठ टेकवावी या हेतूने त्याने बरोबर आणलेल्या मुंडाशाच्या कपड्याची गुंडाळी जमिनीवर ठेवली आणि त्यावर डोकं ठेवून अंग सैलावलं. वर नजर टाकताच घुमटाच्या आतल्या बाजूला केलेली नक्षी त्याला दिसायला लागली. त्या नक्षीमध्ये एक मौलवी, त्याच्या आजूबाजूला सोनेरी पंख असलेले फरिश्ते आणि वर आकाशातून त्यांना बघत असणारे जिन्ना चितारलेले होते. मशिदीच्या खांबांवर कुराणाच्या सुरांमधल्या निवडक आयतांची नक्काशी होती. एकूणच या सगळ्या दृश्याकडे बघून आपोआप शुक्रीला मनःशांती मिळाल्यासारखं वाटत होतं. त्या चित्रांकडे बघता बघता त्याची तंद्री लागली.

जमिनीच्या आतून अचानक कोणीतरी टकटक केल्यासारखा आवाज ऐकू आल्यामुळे शुक्री भानावर आला. त्या आवाजाचा उगम नक्की कुठून होतो आहे, हे नं समजल्यामुळे आधी त्याने आजूबाजूला बघायला सुरुवात केली. मशिदीबाहेरून कोणीतरी भिंतींवर काही ठोकाठोक करताय की काय, अशी शंका येऊन तो बाहेरही जाऊन आला. कुठेही काहीही नं सापडल्यामुळे अखेर आपल्याला भास झाला असावा, अशा विचारांनी तो मशिदीत परतला आणि त्याने दार लावून फावडं उचललं. फावड्याने जमिनीवरचा मातीचा ढीग बाजूला करणार, तोच पुन्हा त्याला तोच आवाज ऐकू आला. या वेळी आवाज जास्त मोठा होता. अखेर शुक्रीला तो आवाज जमिनीतून येत असल्याचा अंदाज आला. काही क्षण त्याची माती कुंठित झाली आणि भेदरून त्याच्या हातातलं फावडं खाली पडलं. 

' या मशिदीत जमिनीखाली कोण आहे? आणि जमिनीखालून टकटक करण्यामागे त्याचा काय हेतू आहे? ' शुक्रीला आता काही समजेनासं झालं. कदाचित मशिदीखाली एखादं तळघर असावं अशी शंका येऊन त्याने कान जमिनीला लावला. बाजूला पडलेल्या एका फरशीच्या तुकड्याने त्याने त्या भुसभुशीत जमिनीवर आवाज केला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा जमिनीतून तसाच आवाज आला. शेवटी त्या तळघराच्या मागोवा घ्यायचा निश्चय करून शुक्रीने कुदळ-फावडं सरसावलं. जमिनीवर कुदळीचे घाव घालत त्याने माती मोकळी करायला सुरुवात केली. चार-पाच मिनिटांच्या मेहेनतेनंतर अखेर कुदळीच्या एका जोरकस घावानंतर जमिनीत एक मोठं भगदाड तयार झालं










Comments

Popular posts from this blog

मुहारीब

भ्रम

सफर