मृगजळ
अब्दुल झपझप पावलं टाकत वाळू तुडवत आपल्या गावाकडे चालला होता. गाव बराच लांब होतं. ज्या रस्त्याने आपण गावाकडे चाललोय, त्या रस्त्यावर गाव यायच्या आधी कब्रिस्तान आहे आणि त्या कब्रिस्तानाच्या बाजूने जाणाऱ्या कोणत्याही जिवंत माणसाला सूर्यास्तानंतर कब्रिस्तानातले सैतान पकडतात आणि आपली रक्ताची तहान भागवून कब्रिस्तानबाहेर फेकून देतात अशी त्याच्या गावात अनेक वर्षांपासून लोकांना ऐकिवात असलेली दंतकथा त्याच्या मनात रेंगाळत होती. गावापासून चाळीस मैलांवर असलेल्या बाजारात तो आपला माल विकायला पहाटेच गेला होता. घरच्या मेंढ्यांची तांबूस करडी लोकर आणि बायकोने तयार केलेल्या मासे साठवायचा टोपल्या दर आठवड्याला नित्यनेमाने एक दिवसाआड बाजारात न्यायच्या, विकायच्या आणि त्या पैशातून बाजारातूनच खायचं प्यायचं जिन्नस घेऊन घरी यायचं हे अगदी ठरल्याप्रमाणे व्हायचा आणि आजही झालं. फक्त बाजारातून निघायला उशीर झाल्यामुळे उन्हं कलली तरी तो गावाच्या वेशीपासून बराच लांब होता. दूरवरून मशिदीची माघरीबच्या नमाजाची बांग त्याला ऐकू आली. सूर्यास्त होऊन आता आसमंतात मंद लालसर प्रकाश पसरलेला दिसत होतं आणि हळू हळू तोही कमी कमी होत काळ...